सांडव्याच्या समर्थ कृषी पर्यटनचे उदघाटन

मठ-मंदिरांतून समाज जागरण होणे अपेक्षित :आरएसएसचे प्रांत संघचालक नाना जाधव
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः
नगर तालुक्यातील सांडवे (चिचोंडीपाटील) येथील समर्थ कृषी पर्यटनांतर्गत उभारण्यात आलेले बांबू हाऊस व शेजारील श्रीस्वामी समर्थ मठ लोकार्पणातून अध्यात्म, आरोग्य व पर्यटन अशी त्रिसूत्री साकारली गेली आहे. अशा प्रकारच्या मठ-मंदिरांतून समाज जागरणाचे व समाजात भारतीय संस्कृती रुजवण्याचे काम व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेशअण्णा उर्फ नाना जाधव यांनी रविवारी व्यक्त केली.

दैनिक लोकमंथन व लोकन्यूज 24 माध्यम समूहाचे प्रमुख संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी नगर तालुक्यातील सांडवे व चिचोंडी पाटील या गावांच्या सीमेवर श्रीस्वामी समर्थ मठाची उभारणी केली असून, नुकतेच त्याचे पुनर्निर्माण केले आहे. तसेच त्याच्या शेजारीच योग-आरोग्य-आहार मार्गदर्शनासाठी बांबू हाऊस निर्माण केले आहे. त्याचे उदघाटन प्रांत संघचालक जाधव यांच्यासह पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाले. यावेळी महापालिकेचे निवृत्त शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, शिवसेनेचे पुणे जिल्हा उपप्रमुख अनिल सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक नेते विष्णुपंत खांदवे, माजी सभापती प्रवीण कोकाटे, दैनिक लोकमंथन व लोकन्यूज 24 माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संपादक रोहित सोनवणे, शिवसेनेचे नगरचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, मंदार मुळे, अ‍ॅड. अभिजीत पुप्पाल, नितीन घोडके, डी. जी. सोनवणे आदींसह अन्य उपस्थित होते.


यावेळी बोलताना जाधव म्हणाले, ऋषी व कृषी ही भारतीय संस्कृती आहे. ऋषी संस्कृतीनेच कृषी संस्कृती रुजवली आहे व जेथे ऋषी-कृषी संस्कृतीचा संयोग होतो, तेथे मनःशांती मिळते. जीवनात शरीर, मन व बुद्धीचा समन्वय गरजेचा असून, योगासनांतून शरीर, ध्यानधारणेतून मन व लीनतेतून बुद्धी विकास होतो. या पार्श्‍वभूमीवर समर्थ कृषी पर्यटन उपक्रम मठ-मंदिर संस्कृती रुजवत असल्याने येथे समाजाचे जागरण अपेक्षित आहे. अध्यात्म विचार, शास्त्रीय आहार, आरोग्य व मनःशांतीचे मार्गदर्शन येथे झाले तर ते समाजाला उपयुक्त ठरेल, असे सांगून ते पुढे म्हणाले, पाश्‍चात्य लोक कुटुंबाला महत्त्व देत असून, आपण मात्र विभक्त होण्याला प्राधान्य देत असल्याने आपली कुटुंब व्यवस्था अडचणीत आली आहे. त्यामुळे कुटुंब प्रबोधन होताना प्रत्येकाला महापुरुष होण्याची उर्जा व पर्यावरण रक्षणातून समाजरक्षण समर्थ कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पोलिस अधीक्षक पाटील यांनी, समर्थ कृषी पर्यटनातून अध्यात्म व मनःशांती यांचा सुंदर समन्वय साधल्याचे गौरवोदगार व्यक्त केले. पोलिस व पत्रकारांना सतत कार्यरत राहावे लागत असल्याने आरोग्य समस्या भेडसावतात. अशा स्थितीत अध्यात्मातून मनःशांती व निसर्गरम्य बांबू हाऊसद्वारे विरंगुळा उपयुक्त ठरणारा आहे. पोलिस आनंदी राहावा म्हणून जिल्हा पोलिसांनीही संवाद उपक्रम राबवल्याने तो पोलिसांना फायदेशीर ठरला आहे. या पार्श्‍वभूमीवर, अशा समाज संवादाचे, अध्यात्म मार्गदर्शनाचे व कृषी पर्यटनातून विरंगुळ्याचे क्षण समर्थ कृषी पर्यटनातून समाजाला मिळतील व नवी उर्जा देतील, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक पाटील यांनी व्यक्त केला.
डॉ. सोनवणे यांनी स्वागत करताना, स्वामी समर्थ मठ उभारणीची तसेच समर्थ कृषी पर्यटन-बांबू हाऊस संकल्पनेची माहिती दिली. खांदवे, कुलकर्णी, कटके, कोकाटे यांनी शुभेच्छा देताना सांडवे व चिचोंडी पाटील परिसराचे वैभव या प्रकल्पांमुळे वाढल्याचे आवर्जून सांगितले. अध्यात्म, निसर्ग व निसर्गोपचाराचे हे केंद्र आरोग्यदायी समाज घडवण्याचे काम करील, असा विश्‍वासही व्यक्त केला.दिनेश करंडे यांनी प्रास्ताविक केले. सौ. शोभा सोनवणे, रोहित सोनवणे व सौ. अंकिता सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी सुरेश देवकर, चंद्रकांत जाधव, महादेव कोकाटे, गंगाधर देवकर, शंकर कोकाटे, भाऊ घोलप, लक्ष्मण देसाई आदींनी परिश्रम घेतले. यावेळी सांड़वे तसेच चिचोंडी पाटील परिसरातील नागरिक, महिला, मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. समर्थ कृषी पर्यटनाच्या बांबू हाऊस परिसरात सेल्फी व फोटो घेण्याची लगबग सर्वांचीच उत्साहात सुरू होती.

👉त्यासाठी वाढीव रजा देतो
पोलिसांवरील कामाचा तसेच कौटुंबिक ताणतणाव वाढल्याचे सांगताना पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, अनेक पोलिसांचे रजेचे अर्ज माझ्याकडे येतात. बहुतांश अर्जांमध्ये कुटुंबातील कोणीतरी आजारी असल्याचे कारण सांगितले जाते. पण ते अर्ज मंजूर करताना मी त्यांना आवर्जून सांगतो की, मुलाचा वाढदिवस करायचा आहे वा कुटुंबासह कोठेतरी फिरायला जायचे आहे, अशा कारणांसाठी अर्ज केला तर तुम्हाला मी दोन दिवस वाढीव रजा देतो. याचा परिणाम सकारात्मक होत असून, अनेक पोलिस यातून कुटुंबाला वेळ देऊ लागले आहेत. पोलिस आनंदी राहिला तरच तो सक्षमपणे समाजाची सेवा करू शकेल, या भावनेतून असे अनेकविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!