‘देहू’त पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण उत्साहात


👉देहूमध्ये पंतप्रधान मोदींची घोषणा:पालखी मार्ग विकासास ११०० कोटी खर्च करणार, ३५० किमीचा महामार्ग बनवणार!
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
देहू-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१४) देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पार पडला. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान श्री मोदी म्हणाले की, पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासासाठी सरकार ११०० कोटी खर्च करणार. या माध्यमातून ३५० किमीचा महामार्ग तयार करण्यात येणार, अशी घोषणाही नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यात तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे काम २ टप्प्यात करण्यात येईल, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. याशिवाय महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ, मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षा भूमीचाही विकास करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.
देहू हे संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ आहे. अशा या देहूच्या पवित्र तीर्थभूमीवर मला येता आले, हे मी माझे भाग्य समजतो. ‘जेथे नांदे देव पांडुरंग, धन्य ते क्षेत्रवासी लोक’, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, देहू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थान उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसरे ,मारुतीबाबा कुरहेकर, आचार्य तुषार भोसले आदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, संत तुकाराम यांची शिळा केवळ शिळा नसून ती भक्तीची प्रेरणा आहे. या शिळेवर स्वत: तुकाराम महाराजांनी 13 दिवस तपस्या केली. त्यामुळे ही शिळा भक्ती आणि ज्ञानाची आधारशिला आहे. तुकाराम महाराज यांच्या गाथांचे रक्षण करणारे सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज यांनाही मी नमन करतो. तुकाराम महाराज गरीब, श्रीमंत असा भेद मानत नव्हते. तसा भेदभाव करणे मोठे पाप असल्याचे तुकाराम महाराज म्हणत. सरकारदेखील तुकाराम महाराजांच्या याच शिकवणुनूसार सबका साथ ,सबका विश्वास या धोरणाने काम करत आहे, असे मोदी म्हणाले.
भारत ही संताची भूमी आहे. समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम संतांनी सदैव केले आहे. भारतीय संस्कृती टिकवून ठेवत ती पुढे नेण्याचे काम संतांनी केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत तुकाराम महाराजांनी त्याग करत समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या अभांगानी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. सांस्कृतिक मूल्य आधारित त्यांच्या अभंगांनी समाजाला उर्जा दिली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा दूर करून सश्रद्ध समाज तयार करण्याचे काम केले. त्यांच्या शब्दांचे धन कोणीही बुडवू शकले नाही. इंद्रायणीने त्यांचे शब्द पुन्हा वर केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे काम पंतप्रधान करत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!