कोरोना संसर्गाच्या अटकावासाठी शासकीय विभागांनी समन्वय ठेवावा : बानायत


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उपविभागीय बैठकीत सूचना ;  मंदिर व प्रशासनाने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज रहावे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – 
येत्या 7 ऑक्टोंबरपासून श्री.साईबाबा मंदिर सुरू होणार आहे.  कोरोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी राहाता व शिर्डी मधील महसूल, पोलिस, आरोग्य, बांधकाम, नगरपालिका, रेल्वे, एस.टी, विमानतळ व इतर सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामकाज करावे आणि कोरोना नियमावलीची  काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बाणायत यांनी आज येथे केल्या.
धार्मिकस्थळे सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उपविभागीय बैठक साईबाबा संस्थानच्या सभागृहात आज संपन्न झाली.  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यावेळी श्रीमती बानायत बोलत होत्या. या बैठकीला संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, शिर्डी चे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, राहाता पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, शिर्डी विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक श्री.सुनिल श्रीवास्तव, औद्योगिक सुरक्षा बलाचे उपसमादेशक दिनेश दहिवदकर, विमानतळाचे सर्व ऑपेटर्स,  शिर्डी रेल्वे स्थानकाचे प्रबंधक एल.पी.सिंह, रेल्वे पोलीस बलाचे पोलीस निरीक्षक सी.पी.सिंह, वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता डी.डी.पाटील, एस.टी. महामंडळाचे आगार व्यवस्थापक, हॉटेल असोशिएशन व हॉकर्स असोशिएशनचे पदाधिकारी यावेळी  उपस्थित होते.
श्रीमती बानायत म्हणाल्या,” प्रशासनाने भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाले पाहिजे. प्रत्येकाने 6 फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक व सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या कोरोना नियमावलीतील मुख्य तीन नियमांचे पालन भाविक व नागरिकांकडून झाले पाहिजे. यासाठी प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. अशावेळी जे नियमावलीचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कार्यवाही करावी.”
“नगरपालिका व बांधकाम विभागाने शहर व परिसरात जेथे रस्ते खराब असतील तेथे रस्ते दुरूस्ती व डागडुजीचे काम हाती घ्यावे. भक्तांसाठी पुरेशी वाहनतळाची व्यवस्था आहे का याचा आढावा पोलीस विभागाने घ्यावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा अधिक सावधानता दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली होती त्यामुळे दक्षता बाळगावी. यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने समन्वय ठेवावा. शहर व परिसरात ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून कोवीड नियमांचे पालन करण्याबाबत जाणीव-जागृती करावी.” अशा सूचनाही बानायत यांनी यावेळी केल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी राहाता व शिर्डी मधील कोरोना रूग्णसंख्या व त्या अनुषंगाने प्रशासनाने घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. श्री.शिंदे म्हणाले, “राहाता तालुक्यात आतापर्यंत 24 हजार 169 रूग्ण आढळून आले आहेत. यातील 18 हजार 700 रूग्ण केवळ दुसऱ्या लाटेतील आहेत. 359 सक्रीय रूग्ण आहेत. आतापर्यंत 462 कोरोनामुळे मृत्यु झाले आहेत. यात 400 मृत्यु हे दुसऱ्या लाटेत झाले आहेत. शिर्डी शहरात आतापर्यत 1 लाख 29 हजार लोकांनी कोरोना लसीचा पहिला  डोस घेतला आहे. तर 56 हजार लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.  राहाता तालुक्याचा पॉझिटिव्हीटी  रेट 5.03 इतका आहे. तेव्हा  प्रशासनाने सतर्कता बाळगली पाहिजे. कोठेही कोवीड नियमात हलगर्जीपणा होणार नाही याची प्रामुख्याने काळजी घ्यावी.” 
शिर्डी मध्ये दक्षिण भारतातून जास्त भाविक येत असतात. अशा भाविकांची रेल्वे, विमानतळ व एस.टी बसस्थानकाच्या ठिकाणीच कोवीड तपासणी करावी. अहवाल निगेटिव्ह आल्यावर भाविकाला पुढे प्रवास करू द्यावा. अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या. शासनाने  दिनांक 24 सप्टेंबर 2021 जारी केलेल्या शासन निर्णयातील निर्देशाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी वाचन केले. तसेच प्रत्येक विभागाने त्याप्रमाणे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. असेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले. यावेळी पोलीस, नगरपालिका, रेल्वे, विमानतळ, एस.टी महामंडळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही त्यांच्या सूचना बैठकीत मांडल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!