संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- कर्जत शहारामध्ये विनामास्क फिरणा-यांकडून दंड घेऊन व मास्क देऊन त्या महाशयांना 2 तास पोलिसांना मदतीसाठी रस्त्यावर उभे करण्याची कर्जत पोलिसांनी आगळीवेगळी कारवाई केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल , कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पो.नि. चंद्रशेखर यादव, पो.काॅ बाळासाहेब यादव, गोवर्धन कदम, बळीराम काकडे, भारत डांगोरे, शकील बेग, नितीन नरोटे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
कर्जत शहरामध्ये रस्त्यावरील गर्दी होत असल्याने, कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्वतः व पोलीस कर्मचारी मिळून कर्जत शहारामध्ये विनामास्क फिरणारे व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही लोकांना दंडात्मक कारवाई करण्यात आली, परंतु काही नागरिक कारवाईबाबत नाराजी व्यक्त करतात, काहींना कारवाईचा राग येतो, किती रुपये पावती आहे सांगा असे म्हणून पैसे मोजू लागतात अशा नागरिकांना कर्जत पोलिसांनी स्वतः जवळचे मास्क तोंडास लावण्यास दिले. यानंतर त्या महाशयांना 2 तास पोलिसांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उभे केले. यानंतर त्या महाशयांना दोन तासात काय अनुभव आला, तेही सांगावेत, असे ठणकावून सांगितले.
दरम्यान काही वेळ पोलिसांसोबत काम केल्यानंतर नागरिकांना पोलिसांच्या कामाबाबत योग्य ती जाणीव झाली आणि यापुढे अशा प्रकारे पोलीस कारवाईला चुकीच्या पद्धतीने मत व्यक्त होणार नसल्याचे अशा भावना व्यक्त केल्या. नागरिकांना समजले की, पोलिस कारवाईसाठी व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरीता आम्ही किती त्रास घेतात, हेच तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव आल्यावर लक्षात आलं असेल, असेही यावेळी नागरिकांना पो.नि.श्री यादव यांनी सांगितले.
कर्जत पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात विना मास्कच्या 74, सोशल डिस्टंसिंग 483, गुटखा खाऊन थुंकणे बाबत कोटपा च्या 20 व मोटार वाहन कायदा अंतर्गत 230 एवढ्या कारवाया केल्या आहेत.




