संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवी दिल्ली – काेराेनाची दुसरी लाट संपताच देशभरात नाेकरभरतीचा वेग वाढल्याचे चित्र दिसत आहे. अलीकडेच वरिष्ठ पातळीवरील आणि अनुभवी व्यक्तींची भरती केल्यानंतर आता भारतीय कंपन्यांनी ताज्या दमाच्या नव्या कर्मचाऱ्यांची (प्रशिक्षणार्थी) भरती करण्यावर भर दिला असल्याचे रिक्रुटमेंट संस्थांकडून मिळालेल्या माहितीत दिसून आले आहे.
टीम लीज स्किल्स युनिव्हर्सिटीच्या सर्वेक्षणानुसार जुलै ते सप्टेंबर या सहामाही कालावधीत जवळपास ४५ टक्के नियाेक्त्यांनी नवीन किंवा अॅप्रेंटीससाठी भरती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर जवळपास ६४ टक्के नियोक्त्यांना त्यांच्या मनुष्यबळात नवीन कर्मचाऱ्यांची (प्रशिक्षणार्थी) संख्या वाढवण्याचा विचार केला आहे. छोट्या व्यवसायात भरती करण्याचा विचार हा आधीच्या सहामाहीतील ८ टक्क्यांच्या तुलनेत दुसऱ्या सहामाहीत वाढून २३ टक्क्यांवर गेला आहे. तर मध्यम व्यवसायामध्ये ३७ टक्क्यांच्या तुलनेत ताे ४२ टक्क्यांवर गेला आहे. माेठ्या व्यवसायांमध्ये भरती करण्याचा हेतू हा पहिल्या सहामाहीतील ५० टक्क्यांवरून ६१ टक्क्यांवर गेला आहे. महिलांची भरती करण्याचा हेतू जुलै-डिसेंबर २०२० मध्ये २३ टक्के हाेता. आता ताे जुलै- डिसेंबर वा काळात ३२ टक्क्यांवर गेला आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या उणिवा दूर करणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे हे यामागील मुख्य कारण आहे.



