👉नागपूर येथे भेट घेत राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेकडे वेधले लक्ष.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : सन २०१६ पासून कल्याण -निर्मल (विशाखापट्टणम ) राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या व रखडलेल्या कामाची तातडीने पूर्तता करण्यासाठी संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सह साखर कारखान्याचे तज्ञ संचालक ऋषिकेश प्रतापराव ढाकणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले. नागपूर येथे मंत्री गडकरी यांची भेट घेत ढाकणे यांनी या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले.
नागपूर येथे गडकरी यांची भेट घेत ऋषिकेश ढाकणे यांनी एन. एच. ६१ या महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल त्यांच्याकडे तक्रार केली. दिलेल्या निवेदनात ढाकणे यांनी म्हटले आहे की, सुमारे १३० कोटी रुपये खर्चुन या महामार्गाचे काम होत आहे. मात्र सन २०१६ आज पर्यत याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही.काम सुरू करताना पाच वर्षांपूर्वी मेहेकरी ते पाडळशिंगी दरम्यानचा सर्व रस्ता व पुल एकाचवेळी खोदून ठेवण्यात आले.नंतर नगर ते मेहेकरी व भुतेटाकळी ते पाडळशिंगी पर्यंतचा सर्व रस्ता पूर्ण झाला. मात्र मेहेकरी ते पिंपळगव्हाण परिसरातील रस्त्याच्या कामाला ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ग्रहण लागले जे आजपर्यंत सुटलेले नाही. याकाळात खोदून ठेवलेले रस्ते व पुलांच्या अर्धवट कामांमुळे ठिकठिकाणी जवळपास ३५० प्रवाशांचा मृत्यु विविध अपघातांत झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागातील नगर व नाशिक येथील अधिकाऱ्यांचेही याकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून आतापर्यंत तीन ठेकेदार कंपन्या बदलूनही या महामार्गाचे काम पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही. सध्या ज्या ठेकेदार कंपनीला त्याचे काम देण्यात आले ते इंगवले कंपनीला ३१ डिसेंबर २०१९ रोजी कामाची जबाबदारी देण्यात आली मात्र त्यांच्याकडून पूर्ण क्षमतेने काम सुरू करण्यात आलेले नाही. तसेच यापूर्वी व सध्या संदीकरणाचे व रस्त्याचे काम चालू त्यात नित्कृष्ट दर्जा मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे किंवा मोठमोठे खड्डे पडले आहेत. साईडपट्या भरण्यातही मातीचा वापर केला जात असल्याने अनेकदा जड वाहने त्यात खचून अपघात होत आहे. पुलांच्या रखडलेल्या कामामुळे विशेषत: पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना वाहनधारकांना करावा लागतो तसेच रस्त्याशेजारील शेती पिकांनाही मोठा फटका त्याचा बसतो आहे. या रस्त्याच्या कामामुळे पाथर्डी सारख्या दुष्काळी व डोंगरपट्यातील भाग मुख्य प्रवाहाशी जोडून दळणवळणाच्या माध्यमातून या परिसराचा विकास होण्याची मोठी संधी असून केवळ ठेकेदाराच्या मनमानी कामामुळे तालुक्यातील अनेक उद्योगधंदे व व्यावसायिक स्थलांतरीत होण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत. मेहेकरी ते भुतेटाकळी या ५२ कि.मी. अंतरातील काम रखडल्याने संपूर्ण महामार्गाला अवकळा आल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. मराठवाड्याला पश्चिम, उत्तर महाराष्ट्राला तसेच मुंबई विभागाला कमी अंतराने जोडणारा एकमेव महामार्ग असूनही त्याच्या कामाकडे होत असलेले संबंधित विभाग व ठेकेदार कंपनीला तातडीने या कामाची पूर्तता करण्याचे आदेश द्यावेत असे साकडे ढाकणे यांनी मंत्री गडकरी यांना घातले.



