👉दहा हजाराला रोज 150 रु व्याज घेणाऱ्या सावकारावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!*
👉60 हजाराचे रोज 900 रु असे 1,51,000 दिले तरी मुद्दल शिल्लकच, काही आठवडे व्याज थकले म्हणून गाडी ओढून नेली.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कर्जत- कर्जाने पैसे देऊन महिन्याला 45 टक्क्याने व्याज आणि 10 हजाराला रोज 150 रु व्याज वसूल करणा-या सावकाराविरुध्द कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सावकारांच्या व्याजाच्या अवैध व्यवसायातील अनेक करामती पाहून पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की, कर्जत येथील खाजगी सावकार अभि उर्फ बुट्या अनिल पवार याच्याकडून फिर्यादी राहणार (रा.अण्णाभाऊ साठेनगर कर्जत) यांनी आपल्या मुलीच्या उपचारासाठी 8 महिन्यांपूर्वी ६० हजार रुपये (१० हजाराला 150 रुपये रोज) याप्रमाणे घेतले होते.प्रत्येक आठवड्याला व्याजापोटी ६ हजार ३०० रक्कमही रोख स्वरूपात सावकाराला देत होते.फिर्यादीने सुमारे ६ महिने व्याजापोटी १ लाख ५१ हजार रुपये दिले.मात्र परिस्थितीमुळे व पैसे न जुळल्याने दोन महिन्याचे व्याज देता आले नाही.आरोपीने प्रत्यक्ष व फोनवर व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावला.फिर्यादीने विनंती केली. मात्र ‘रोजाच्या पैशाला मी थांबू शकत नसल्याचे सांगत मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत नाहीतर मी तुला बघून घेईन’ असा दम देत होता.त्यानंतर दि.२ रोजी आरोपीने घरी येऊन पैशांची मागणी केली.मात्र ‘आत्ता पैसे नाहीत पैसे आल्यानंतर व्याजासह देईन’ असे त्याला सांगितले मात्र ‘तुझे आत्ता नेहमीचेच झाले’ असे म्हणत फिर्यादी वापरत असलेला हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल (एम.एच.१६ व्ही.३२२७) ही जबरदस्तीने घेऊन गेला. मोटारसायकल माझी नाही, मित्राची वापरत आहे, ती नेऊ नकोस’ असा फिर्यादीने विरोध केला मात्र ‘माझे व्याजासहित पैसे परत दिले तरच तुला मोटारसायकल देईन’ असा दम देऊन बळजबरीने मोटार सायकल घेऊन गेला. कर्जत पोलिसांनी या सावकारावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ व इतर कलमाप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
👉सावकारांनो,नागरीकांना त्रास द्याल तर याद राखा!
‘दिलेल्या रकमेवर अव्वाच्या-सव्वा मनाप्रमाणे व्याज लावून सावकार सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांची आर्थिक, मानसिक पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे.यात अनेक कुटुंबांची फरफट होत आहे.मात्र कोणत्याही सावकाराने असा त्रास दिल्यास याद राखा अशी कोणतीही तक्रार आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही.’
–चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक कर्जत
“अवैध सावकारकीत सावकारांकडून गोरगरीबांच्या,शेतकऱ्यांच्या जमीनीही आपल्या नावावर करून घेण्यात आल्या आहेत. मात्र अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कर्जत पोलीसांनी पुढाकार घेतला आहे. सावकरांकडून कोणास त्रास असल्यास कर्जत पोलिसांशी संपर्क करावा. सावकारांना घाबरण्याची गरज नाही, तक्रारदाराला मदत केली जाईल .”
–चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक




