👉स्पेशल ड्राईव्ह मध्ये 2 हजार 923 प्रकरणे निकाली, 👉तब्बल ७२ कोटीहून अधिक रकमेची वसुली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, बार असोसिएशन, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन यांच्या वतीने रविवारी (दि. १ ऑगस्ट) आयोजित कऱण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आभासी पद्धतीने तसेच कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत प्रत्यक्षरित्याही कामकाज करण्यात आले. जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील तालुका न्यायालये यामध्ये एकूण ११ हजार ३५३ प्रकऱणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशीच नागरिकांनी या लोकअदालतीत परस्पर समझोता करुन प्रकरण निकाली काढले आणि खऱ्या अर्थाने मैत्री दिन साजरा केला. जिल्हयामध्ये ७ हजार ७६३ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर ३ हजार ८६० प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच तब्बल ७२ कोटी ३७ लाख २६ हजार ७८१ इतक्या रकमेची वसुली करण्यात आली.
रविवारी या राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन जिल्हा न्यायालय, अहमदनगर तसेच सर्व तालुका न्यायालय येथे करण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन. आय. अँक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्यातील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज महावितरणची समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती. लोकअदालतमध्ये आभासी पध्दतीने उपस्थित राहून तसेच प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये देखील हजारो प्रकरणे मिटविण्यात आली. जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये कोव्हीड-19 नियमांचे तंतोतंत पालन करून नागरीकांची प्रकरणे आपसामध्ये समझोता करून मिटविण्यात आली. मैत्री दिनाच्या दिवशी बरेच नागरीक मैत्रीच्या संबंधासह आपसातले वाद मिटवून हसत बाहेर जाताना दिसून आले. जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगरचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा आणि जिल्हा न्यायाधीश क्र. 1 मिलींद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष भुषण बऱ्हाटे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सेंट्रल बार असोसिएशन प्रतिनिधी अँड. सोनी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
बॅंका व महानगरपालिका यांची दाखलपूर्व प्रकरणेही यामध्ये मिटवण्यात आली. ही लोकअदालत न्यायाधीश, वकील, पोलीस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरीतीने पार पडली. याशिवाय, जिल्ह्यात दिनांक २९, ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या विशेष मोहिमेअंतर्गत (स्पेशल ड्राईव्ह) २ हजार ९२३ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामुळे लोकन्यायालय व स्पेशल ड्राईव्ह मिळून १४ हजार २७६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीमध्ये ठेवलेल्या प्रलंबित प्रकरणांची संख्या ४९ हजार २७ इतकी होती. पैकी, तडजोडीने मिटविलेल्या प्रकरणांची संख्या ११ हजार ३५३ इतकी आहे.



