सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी : प्रा. दादासाहेब फुंदे पाटील
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
पाथर्डी : तालुक्यात गेल्या दोन आठवड्या पासुन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे . त्यामुळे राज्य सरकारने पाथर्डी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भुतेटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. दादासाहेब फुंदे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्ता भरणे यांना इ-मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे..
दादासाहेब फुंदे पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की , पाथर्डी तालुक्यात १५ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर या रोजी अचानक ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे फुंदेटाकळी,खरवंडी, कोरडगाव, दैत्यनांदूर, येळी, कोळसांगवी,साकेगाव, निपाणी जळगाव, पागोरी पिंपळगाव या परिसरातील पिके नष्ट झाली आहेत. या मध्ये कापूस, तूर, कांदा, सोयाबीन, इत्यादी पिके नष्ट झाली आहेत. त्याच बरोबर आंबा, डाळिंब,मोसंबी, संत्री इत्यादी फळ बागांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडुन पडला आहे . तरी पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत तात्काळ द्यावी , अशी मागणी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री श्री. दत्ता भरणे यांच्या कडे प्रा. दादासाहेब फुंदे पाटील यांनी केली आहे.


