पारनेर तालुक्यात गावठी हातभट्टी अड्ड्यावर अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचचा छापा ; पावणे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील पळसपूर शिवारातील गायरान परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचने छापा टाकला आहे. या कारवाईत ११ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचचे पोनि किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोहेकाॅ. लोटके, पोना. सगर अशोक ससाणे, पोकाॅ आकाश काळे, पोकाॅ विशाल तनपुरे, चासफौ. महादेव भांड आदींच्या टीमने ही कारवाई केली.

या कारवाईत क्राईम ब्रॅंच पोलिसांनी शेडमध्ये पिराजी विहुल आहेर, गोकुळ बाबाजी आहेर व रावसाहेब भगवंत ढोले यांना दारू तयार करताना पकडले. प्राथमिक चौकशीत पिराजी आहेर याने हा व्यवसाय स्वतःचा असल्याचे कबूल केले.
झडतीदरम्यान कच्चे रसायन २ हजार ४०० लिटर (९ लाख ६८ हजार रुपये), तयार गावठी दारू २१० लिटर (२ लाख १० हजार रुपये) एकूण जप्त मुद्देमाल अंदाजे ११ लाख ७८ हजार रुपये
उपलब्ध नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गु. र. क्र. ५७७/२०२५ अन्वये बीएनएस २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २(५) सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ)(क)(ड)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहे.
कोणत्याही परिसरात अशा प्रकारे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती असल्यास ती तात्काळ पोलीस विभागास कळवावी. अशा प्रकारच्या अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांनी केले आहे.


