संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
श्रीरामपूर ः 13 कोटी 75 लाख, 41 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे. मिनीनाथ विष्णु राशीनकर (वय 38, रा.धनगरवाडी ता.राहता जि.अहिल्यानगर) विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौड जि.पुणे) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपीराकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस पोलिस ठाणे पोनि नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार सपोनि गणेश जाधव, पोउपनि रोशन निकम, पोउपनि रोहिदास ठोंबरे, पोउपनि दीपक मेढे, पोना किशोर औताडे, पोना सोमनाथ मुंडले, पोकॉ संपत बडे, पोकॉ संभाजी खरात, पोकॉ मच्छिंद्र कातखडे, पोकॉ अमोल पडोळे, पोकॉ अजित पटारे, पोकॉ अकबर पठाण, पोकॉ आजिनाथ आंधळे, पोकॉ राहुल पौळ, पोकॉ रमेश रोकडे, पोकॉ झिने, सफौ चालक राजेश सुर्यवंशी, पोकॉ चालक बाळासाहेब गिरी,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोकॉ नितीन चव्हाण, पोकॉ रविंद्र बोडखे, पोकॉ अमोल नागले. पोकॉ नितीन शिरसाठ, चालक पोकॉ दिलीप कुर्हाडे, मपोकॉ अश्वीनी पवार आदींच्या टीमने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.14 मे 2025 रोजी 5 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार याप्रकरणी खात्री करुन कार्यवाही करा, अशा सूचना श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोनि. नितीन देशमुख यांना दिल्या होत्या. त्यांनी तात्काळ पोलीस तपासी टीम व पंचासह एमआयडीसी परिसरात पोहचून एमआयडीसी परिसर व आजुबाजूच्या गावात छोटा हत्ती टेम्पोचा शोध घेतला असतांना दिघी खंडाळा रोडवर एक क्रिम रंगाचा टाटा कंपनीचा एस मॉडेल छोटा हत्ती टेम्पो (एमएच 20 बीटी 0951) असा खंडाळ्याकडून दिघी गावाच्या दिशेने येतांना दिसला. तेव्हा त्या टेम्पोला थांबवून वाहन चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव मिनीनाथ विष्णु राशीनकर असे असल्याचे सांगितले. त्यावेळी वाहनचालक मिनीनाथ राशीनकर व त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पोची पंचांसमक्ष झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढर्या रंगाच्या 21 गोण्या दिसून आल्या. त्यापैकी 14 गोण्यांमध्ये पांढर्या रंगाची पावडर आणि उर्वरित 7 गोण्यामध्ये पांढर्या रंगाचे स्फटीक दिसून आले. वाहनचालक मिनीनाथ राशीनकर यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने स्फटीक हे अल्प्राझोलम औषधाचे असून, गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने त्याबाबत खात्री करण्याकरीता अहिल्यानगर येथील फॉरेन्सीक तज्ञांशी संपर्क साधून ते घटनास्थळी हजर होऊन त्यांनी टाटा टेम्पोमधील गोण्यांमधील स्फटीक व पावडर यांचे निरीक्षण करुन प्रथमदर्शनी स्फटीक हे अल्प्राझोलम हा अंमलीपदार्थ व पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले.
यात 6 कोटी 97 लाख 67 हजार रु.कि.चे 7 गोण्यामध्ये 69.767 कि.ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम चे स्फटिक (क्रिस्टल), 6 कोटी 76 लाख 74 हजार रु. कि.चे 14 गोण्यामध्ये 338.37 कि. ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठीची पावडर, 1 कोटी रु.कि.ची टाटा एस कंपनीचा छोटा हाती (एमएच 20 बीटी 0951) या नंबरचा असा एकूण 13 कोटी 75 लाख 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुद्देमालाबाबत आरोपीकडे विचारणा करता त्याने माल विश्वानाथ कारभारी शिपनकर (रा.दौड,जि.पुणे) याने दिला असल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने व आरोपीच्या ताब्यात तो व्यावसायिक वापराकरीता मोठ्या प्रमाणावर मिळून आला. मिनीनाथ विष्णु राशीनकर, विश्वनाथ कारभारी शिपणकर याने एमआयडीसी.श्रीरामपूर यांच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस
ठाण्यात गुरनं. 499/2025 एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 22(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयात आरोपी मिनीनाथ विष्णू राशीनकर याला अटक करण्यात आली. गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर डिवायएसपी बसवराज शिवपुजे हे करीत आहेत.


