शेंडी बायपासवर ट्रक चालकांकडून पैसे गोळा करणारा पोलीस निलंबित
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : शहरानजीक शेंडी बायपास या ठिकाणी ट्रक चालकांकडून बेकायदेशीर पैसे गोळा करणारा पोलीस अंमलदारास तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई एसपी सोमनाथ घार्गे यांनी केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विकास दळवी असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी समाज माध्यमावर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. त्या व्हिडीओमध्ये शेंडी बायपास परिसरात एक व्यक्ती ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. चौकशी केली असता ही घटना दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० ते ११ वाजे दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.
याबाबत चौकशी केली असता संबंधित व्यक्ती हा होमगार्ड बाळू जाधव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये त्याने मान्य केले की, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विकास दळवी यांच्या सांगण्यावरुन पैसे जमा केले होते.
या गंभीर प्रकरणी पोलीस शिपाई विकास दळवी यांना तात्काळ अहिल्यानगर एसपी सोमनाथ घार्गे यांनी निलंबित केले आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, तसेच समाज माध्यमांवरही याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. प्रकरणी प्राथमिक चौकशी आदेशित केली आहे.
होमगार्ड बाळू जाधव यांचा कसुरी अहवाल पुढील कार्यवाहीस्तव समादेशक, गृह रक्षक दल, अहिल्यानगर तथा अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.


