शिर्डीनजिक २ वर्षापूर्वीच्या खूनातील आरोपी निष्पन्न ; अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : ”तू माझा नवरा आहे” असे वेळोवेळी ती बोलत होती, त्यावरुन इतर लोकही चिडवत होते, या कारणातून शिर्डी बसस्थानक येथे भिक्षा मागणारी अनोळखी मयत महिलाचा
सावळीविहीर बु, (ता. राहाता ) हद्दीत दोन वर्षापूर्वी खून केल्याचा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या खून प्रकरणी आकाश मोहन कपिले (वय २८, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यास अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचने अटक केली आहे.
एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोउपनि दीपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, ह्रदय घोडके, लक्ष्मण खोकले, दिपक घाटकर, रमीझराजा आतार, सुनिल मालणकर, भगवान धुळे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की दि.१९ सप्टेंबर २०२५ रोजी सावळीविहीर बु, (ता. राहाता )येथील के. के. मिल्क जवळील दगड खाणीमध्ये एक अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ३५ वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नंबर ३२/२०२३ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये यातील मयत महिला हिचा गळा आवळून खून झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता, यावरुन शिर्डी पोलीस ठाण्याचे सपोनि पप्पु यासीन कदरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८७/२०२४ भादवि कलम ३०२,२०१ प्रमाणे अज्ञात आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा अद्यापपर्यंत उघडकीस आला नव्हता.
एसपी सोमनाथ घार्गे यांनी अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचला अहिल्यानगर जिल्ह्यातील ना उघड खूनाच्या गुन्ह्याची माहिती संकलित करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली ना उघड खुनाचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष तपासी टीम तयार करण्यात आली. तपासी टीमने अहिल्यानगर जिल्ह्यातील ना उघड खुनाचे गुन्ह्याची माहिती संकलित करुन आरोपींची माहिती काढत असतांना व्यवसायिक कौशल्य व गुप्त बातमीदारांच्या मार्फत आकाश मोहन कपिले (रा. शिर्डी, ता. राहाता) याने मागील २ वर्षापूर्वी एका महिलेस के. के. मिल्क जवळील दगडाचे खाणीजवळ नेवून तिला ठार मारुन तिचा मृतदेह खाणीमध्ये टाकलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे आकाश कपिले याचा शोध घेत असतांना तो शिर्डी या ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यास गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने विचारपुस केली. या दरम्यान त्याने सांगितले की, त्याचा मानलेला मामा संदिप रावसाहेब झावरे (रा. शिर्डी ता. राहाता) याने शिर्डी बसस्थानक येथे बाहेरील राज्यातील बस बुकींगचे करारपत्र केले होते. त्यावेळी तो त्याच्या मामासोबत शिर्डी बसस्थानक येथे प्रवाशी बुकींगचे काम करत होता. शिर्डी बसस्थानक येथे भिक्षा मागणारी अनोळखी मयत महिला ही त्यास ”तू माझा नवरा आहे” असे वेळोवेळी बोलत होती. त्यावरुन बसस्थानक येथील इतर लोकही त्यास याबाबत चिडवत होते. या कारणाचा राग मनात धरुन त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दि.१७ मार्च २०२३ रोजी त्याच्याजवळील होडा कंपनीची डिओ मोपेड क्रमांक (MH१७ BW६९५०) या दुचाकीवरुन शिर्डी बसस्थानकवर भिक्षा मागणारी मयत महिला हिला शिर्डी बसस्थानकवर या ठिकाणीहून सावळीविहीर गावाच्या शिवारातील के.के. मिल्क जवळील दगडाच्या खाणीजवळ नेऊन तिचा गळा आवळून खून केल्याचे व तिचे प्रेत खाणीमध्ये टाकले असल्याची कबुली त्याने दिली.
अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचला मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये कोणताही धागादोरा नसतांना कौशल्यपणाला लावून गुन्हा उघडकीस आणला आहे. ताब्यातील आरोपीस शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८७/२०२४ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर केले. या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.


