संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट वापरावे असे ठरविण्यास राज्य सरकारने गेल्या आठवड्यात मान्यता दिली. मात्र, या शासकीय निर्णयाला ओबीसी नेते आणि समाजाकडून मोठा विरोध होत आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. पण आता ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तर या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. भुजबळांनी सरकारच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात दंड थोपटले असून सरकारने जीआरमध्ये लिहिलेली शब्दरचना भविष्यात ओबीसींना अडचणीची ठरणार असल्याचा दावा भुजबळांनी केला आहे.
ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. 8 सप्टेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत, त्या आपले मतप्रदर्शन करत आहेत. कोणी उपोषण करत आहे, कोणी मोर्चे काढत आहेत, कोणी भाषण करत आहेत. मी सुद्धा आपापल्या पद्धतीने जे काही काम करायला पाहिजे, ते करणार आहे. समता परिषदेच्या माध्यमातून आम्हाला ज्या पद्धतीने जायचे आहे, त्या पद्धतीने आम्ही जात आहोत. बाकी माझे एवढंच म्हणणे आहे की, या सगळ्यात आपला विषय फक्त असा की, या जीआरमध्ये जी शब्दरचना आहे, ती पुढे ओबीसीसाठी अडचणीची ठरणार आहे. आज जरी सरकरार सांगत आहे की, कोणालाच त्रास नाही, कोण सांगत मराठ्यांचे प्रश्न सुटले, कोण सांगत की तीन कोटी लोक ताबडतोब ओबीसी झाले. त्यामुळे हे जर खरं असेल तर ते खोटं आहे. त्यामुळे ते खरं खोटं काय आहे? हे शोधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी भुजबळांनी म्हटले.
तसेच, हैदराबाद गॅझेटविरोधात आम्ही कोर्टात जाऊ. पण गेल्या दोन तीन दिवसांपासून वकील सुटीवर होते. त्यामुळे आता एक दोन दिवसात आमचे कार्यकर्ते याबाबत नक्की निर्णय घेतील. पण आमच्या ओबीसींमध्ये 374 जाती आहेत. मराठा ही केवळ एकच जात आहे. त्यामुळे आमच्यामध्ये अनेक नेते आहेत. ज्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. त्यामुळे ते चालुद्यात पण सगळ्यांचा एकच उद्देश आहे की, ओबीसीचे आरक्षण कमी होता कामा नये. पण आता जर आंदोलनच करायचे असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल. आता लहान लहान गावांमध्ये आदोलन सुरू आहे. पण उद्या एकत्रित येऊन आंदोलन सुरू करू, असा इशाराच भुजबळांकडून देण्यात आला आहे.


