संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
श्रीगोंदा – तालुक्यातील येळपणे येथील पत्रकार प्रमोद आहेर यांना सहाजणांनी लोखंडी रॉडने मारहाण करीत एक लाखाची खंडणी मागितली. तसेच दोघांनी त्यांच्या डोक्याला दोन्ही बाजूंनी पिस्तूल लावून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
येळपणे येथील खंडेश्वर कॉम्प्युटर हे भावाचे दुकान बंद करून ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८:३० वाजता घराकडे जात असताना येळपणे-पिसोरे रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ विनाक्रमांकाची इनोव्हा गाडी उभी होती. त्या गाडीजवळ उभे असलेले सुनील उर्फ प्रेम रामदास जाधव व बबन भाऊसाहेब घावटे यांच्यासह चार ते सहाजणांनी पत्रकार प्रमोद आहेर यांना अडवत तू आमचे लोकेशन पोलिसांना देतो, आमच्या बातम्या पेपरमध्ये छापतो, आम्हाला तू ओळखत नाही का? असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
दोन अनोळखी व्यक्तींनी डोक्याला पिस्तूल लावत एक लाख रुपये दे नाही, तर तुला सोडणार नाही. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने खिश्यात हात घालत सात हजार रुपये काढून घेतले. पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू पोलिसात तक्रार केली.
तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याची फिर्याद प्रमोद आहेर यांनी दिली. याबाबत बेलवंडी पोलिसांनी आर्म अॅक्ट ३/२५ सह पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा केला. बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे तपास करीत आहेत… आरोपींच्या अटकेची मागणी
वाळूतस्कर तडीपार गुंड पैशाच्या जीवावर पत्रकारांवर हल्ला करण्याच्या घटना गंभीर असून, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेचा तपास करून सर्व आरोपींना अटक न केल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी दिला.



