संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- कष्टकरी समाज संस्थांना शासकीय कामे देण्यात यावीत, असे शासनाने ठरवून दिले आहे. परंतु तसे न होता वडार मजूर संस्थांना पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागात कामे देण्यास अधिका-यांकडून जाणुनबूजन टाळाटाळ केली जात आहे. या पुढील काळात वडार मजूर संस्थांना शासकीय कामे न मिळाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भारतीय टायगर फोर्सचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष ॲड योगेश गुंजाळ यांनी दिला आहे.
वडारांचे काम वडार मजूर सोसायट्यांनाच मिळाले पाहिजे. नगर जिल्ह्यात वडार समाज मोठ्या प्रमाणात आहे. समाज अंत्यत कष्टकरी असुन या समाजातील मजूर संस्थाना कोरोनामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. खरे तर महाराष्ट्राच्या विकासात या समाजाचे मोलाचे योगदान आहे. सिंचनाच्या सुविधा महाराष्ट्राला या समाजामुळेच मिळाल्या आहेत.अनेक धरणांच्या निर्मितीमध्ये वडार समाजाचे महत्वाचे योगदान आहे. परंतु यांचा विसर राजकारण्यांपासून सर्वांना पडला आहे.
वडार समाजाला उदरनिर्वाहासाठी मजूरी वरच अवलंबून राहावे लागते. या समाजातील मजूर संस्थाना कामे मिळावे, म्हणून भारतीय टायगर फोर्स संघटनेच्या जिल्हाध्यक्ष ॲड गुंजाळ यांनी मुळा पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
हाताला काम व पोटाला भाकर मिळावे, यासाठी मुळा पाटबंधारे विभागाअंतर्गत मंजूर झालेली ५० टक्के कामे अग्रक्रमाने या वडार समाजातील मजूर संस्थांना मिळावे. मंजूर झालेली कामे न मिळाल्यास संघटनेच्या वतीने मुळा पाटबंधारे विभाग कार्यालय समोर वडार मजूराच्या बिह्राडासह गाढव घेऊन तीव्र आंदोलन करण्याचे इशारा ॲड गुंजाळ यांनी निवेदनात दिला आहे.




