संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – गावचे सरपंच, आमदार, खासदार, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक, पुढारी हे गावचे गुरुजी असतात. त्यांनी जर लोकांना योग्य ते मार्गदर्शन केले नाही तर विदयार्थी( लोक) बिघडतात ते योग्य मार्गाने जात नाहीत. त्यामुळे समाजातील या गुरुजींनी स्वतः बदलल पाहिजे तरच, चांगला समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन पाटोदा आदर्श गाव माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील वडगांव येथे सुरू असणा-या श्रावणी सप्ताह दरम्यान मंगळवारी (दि.९) संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदाचे सामाजिक आदर्शगाव माजी सरपंच भास्करराव पेरे यांचे “एकविसाव्या शतकातील खेडे” या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे या उपस्थित होत्या.
श्री पेरे पुढे बोलताना म्हणाले की, शेती ही रासायनिक पद्धतीने न करता सेंद्रीय शेती करा. त्यामुळे माणसाचे आयुर्मान वाढण्यास मदत होईल. प्रत्येक कुटुंबांने शौचालयाचा वापर आग्रहाने करावा. यामुळे रोगराई मुक्त गाव होण्यास मदत होते.
गावच्या विकासाची जबादारी ही गावातील प्रत्येक घटकातील आहे. जर ही जबादारी नीट समजून घेऊन पार पाडली तरच गाव विकसित होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोसत्वाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या’ हर घर तिरंगा ‘या अभियानाबाबत गावकऱ्यांना माहिती दिली. या अभियानात सहभागी व्हावे, असेही आवाहन आमदार राजळे यांनी केले.
यावेळी ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बडे, वंडगावच्या सरपंच रंजना धनवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय बडे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तथा युवानेते डॉ.राजेंद्र खेडकर, आजिनाथ बडे, दगडू बडे, परमेश्वर गरड, गणेश बडे, उद्धव बडे गुरुजीे, आतिष बडे, पिंपळगावचे सरपंच पांडुरंग शिरसाट, ईश्वर बडे आदिंसह पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच आदिनाथ बडे यांनी केले. आभार शेषराव बडे यांनी केले.
👉संपादन-पत्रकार सोमराज बडे


