राष्ट्रवादीच्या नेत्यांची जमीन परस्पर विक्री ; नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर शहरात जागा ताबेमारीचा घटना घडल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड प्रताप ढाकणे यांची जागा एका बहाद्दूरने कोणतीही परवानगी न घेताच गुंठ्याने परस्पर विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरानजिकच्या वडगाव गुप्ता या हद्दीत असलेल्या शेतजमिनीत प्लॉट पाडून परस्पर सुमारे ३३ जणांना खरेदी खत करून देत विक्री करून एकाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी असलेले ॲड. प्रताप बबनराव ढाकणे यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात श्रेणिक धरमचंद खाबिया (रा.सावेडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ॲड. प्रताप ढाकणे यांनी शुक्रवारी (दि.१९ जुलै २०२४) दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली आहे. ॲड. ढाकणे यांच्या मालकीची वडगाव गुप्ता परिसरात एन.ए. न केलेली अविभक्त शेतजमीन आहे. त्यांच्या शेजारीच आरोपी श्रेणिक धरमचंद खाबिया याचीही काही शेतजमीन होती. खाबिया याने ॲड ढाकणे यांना कुठलीही कल्पना न देता त्याच्या जमिनीसह ढाकणे यांच्या जमिनीतही प्लॉट पाडून सुमारे ३३ जणांना ती जमीन आपल्याच मालकीची आहे, असे भासवून विक्री केली.
त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखते ही करून दिली. या ३३ पैकी अनेकांनी तेथे त्यांच्या मर्जी नुसार तारेचे कुंपण तर काहींनी कोणतीही परवानगी न घेता पक्की घरे बांधली आहेत. त्यांनी रस्ता व वहिवाटीचा कुठलाही विचार न करता अतिक्रमणे केली आहेत. हा सर्व प्रकार दि.९ ऑगस्ट २०१९ ते ५ मार्च २०२४ या कालावधीत घडला आहे.


