मोहटागडावर विजेचा धक्का बसून महिलेचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
पाथर्डी : मोहटा देवीच्या यात्रेनिमित्त गावाकडे आलेल्या एका महिलेचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधित मंडप डेकोरेशनवाल्याला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिता नामदेव डोंगरे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या मोहटा येथील असून, सध्या पतीसोबत अहमदनगर येथे मजुरीचे काम करतात. मोहटा देवीच्या यात्रेसाठी त्या आपल्या दोन मुलांसह गावी आल्या होत्या. गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहटा गडाच्या पायथ्याशी मंडप डेकोरेशनसाठी लोखंडी विजेचे खांब उभारण्यात आले होते. या खांबांमध्ये वीज प्रवाह सुरू होता. याचवेळी अनिता डोंगरे यांचा १२ वर्षांचा मुलगा पृथ्वीराज नामदेव डोंगरे हा त्या खांबाला चिकटला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अनिता डोंगरे यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेसाठी देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापन समिती ,आणि मंडप डेकोरेशनवाल्याचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत अनिताच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत या हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे मोहटा गावावर शोककळा पसरली आहे.


