मनपा आयुक्त, पीएच्या शोधासाठी ‘एसीबी’ ची तपास पथके रवाना
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे तसेच त्यांचे स्विय सहायक श्रीधर देशपांडे यांचेवर लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
महापालिका आयुक्तांचे स्विय सचिव श्रीधर देशपांडे याच्या घराची पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या पथकाने घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये 93 हजार रूपये रोख रक्कम, साडे आठ तोळयांचे सोन्याचे दागिने तसेच एकंदरीत नऊ मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे मिळून आली आहेत. मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रु वस्तीमध्ये, उपनगरांमध्ये खरेदी केल्याची कागदपत्रे मिळुन आली आहेत. तसेच बीड जिल्हयात देखील शेतजमीन खरेदी केल्याचे दिसून येत आहे.
यातील लोकसेवकांनी बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी पंचांसमक्ष ८ लाख रूपयांची मागणी केल्याने तोफखाना पोलीस ठाणे (जि. अहमदनगर) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे हे करीत आहेत.


