भगवानगड नारळी सप्ताहास प्रारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी (निलेश ढाकणे): संत भगवानबाबा यांनी सुमारे ९० वर्षांपूर्वी प्रारंभ केलेला भगवानगडाचा नव्वदावा नारळी सप्ताह रविवारी (दि. २१ एप्रिल) पासून सुरू होत आहे. भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगाव ता शिरूर कासार या गावाकडे या वर्षीच्या नारळी सप्ताहाचे यजमानपद असून ग्रामस्थांकडून सप्ताहाचे भव्यदिव्य असे नियोजन करण्यात आले आहे.
बीड-पाथर्डी सिमेवरील भगवानगडाचा नारळी सप्ताह म्हणजे राज्यभरातील वारकरी संप्रदायासाठी मोठी पर्वणीच असते, ही मंडळी सप्ताह ठिकाणी ७ दिवस मुक्कामी राहून या भक्ती रसाचा आनंद घेत असतात.शनिवार दि.२० एप्रिल पासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त भगवानगड – पारगाव येथे येत आहेत.
भगवानगडाचे महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे नियोजन सुरू असून सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यभरातील भाविकांना ज्यांना ऐकण्याची ओढ लागलेली असते असे डॉ नामदेव महाराज शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून ७ दिवस ज्ञानेश्वरी भावकथा निरुपण होणार आहे. सप्ताहामध्ये अनुक्रमे महंत मी. कृष्णा महाराज शास्त्री, ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, केशव महाराज ऊखळीकर, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, रामराव महाराज ढोक, पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तन सेवा होणार आहे. सप्ताहाच्या ७ व्या दिवशी रात्री ८.३० ते ११ या वेळेत भी क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे जागराचे जाहीर हरीकीर्तन होणार आहे. काल्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे अमृततूल्य काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर जय भगवान ग्रुप घोगस पारगाव यांच्या वतीने महाप्रसादाची पंगत होऊन सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.


