पोलिसांच्या ताब्यातील युवक मृत्यू प्रकरण : चौघांविरुद्ध ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल

पोलिसांच्या ताब्यातील युवक मृत्यू प्रकरण : चौघांविरुद्ध ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
चोरीच्या संशयावरून नागरिकांनी ‘ मारहाण करत सुपा पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ४ पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध सुपा (ता. पारनेर) पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ जुलै रोजी पहाटे झाली होती. याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सी.आय.डी.) देण्यात आलेला असून पोलिस उपअधिक्षक शिवाजी आण्णासाहेब डोईफोडे यांनी ५ ऑगस्ट रोजी याबाबत फिर्याद दिली आहे.
हितेशकुमार रविश्वर प्रसाद (वय २६, हल्ली रा. पनवेल, मूळरा. कुशीनगर जिल्हा, उत्तरप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव असून त्याला बेदम मारहाण केल्या प्रकरणी शरद आबा पवार, अमोल संपत पवार, अक्षय दिपक सुपेकर, अमित दिपक सुपेकर (सर्व रा. सुपा, ता. पारनेर) यांच्या विरुद्ध बीएनएस २०२३ चे कलम १०५, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरूण हितेशकुमार प्रसाद हा महाराष्ट्रात कामानिमित्त राहत होता. २३ जुलैच्या पहाटे त्याच्यासह काही साथीदारांनी सुप्याजवळील पवारवाडी येथील यशवंत इंजिनिअरिंग सिमेंट पाईप फॅक्टरीत वीजपुरवठा बंद करून तेथील माल चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हितेशकुमार प्रसाद हा तिथे एक पिकअप व्हॅन (एम एच २० ईजी २३३५) घेऊन थांबलेला होता. फॅक्टरीत वीज गेल्याने चोरीचा संशय आल्याने स्थानिक तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे तरूण येताच हितेशकुमार पिकअप घेउन पळून गेला, मात्र स्थानिक तरूणांनी त्याचा पाठलाग केला, आणि त्याला सुपा टोल नाक्यावर गाठले आणि बेदम मारहाण केली.
हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हितेशकुमार यास ताब्यात घेउन पोलीस वाहनातून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. २३ जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हितेशकुमारची प्रकृती खालावली. त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यास मृत घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे कोणताही संशयित ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी बंधनकारक असते. मात्र तपासणी न करता तासनतास पोलिस ठाण्यातच बसवून ठेवण्यात आल्याने त्याच्या मृत्यूभोवती संशयाचे धुके निर्माण झाले होते.
हितेशकुमारच्या मृत्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृताच्या डोक्यात जड वस्तूने जबरदस्त प्रहार झाल्याने मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. तसेच या गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे सोपविण्यात आला होता. सीआयडी ने टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आरोपी निष्पन्न केले असून या ४ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अहिल्यानगरचे पोलिस उपअधिक्षक सुहास घोडके हे करीत आहेत.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!