👉” सौ मे से निन्न्याण्णव बेईमान, फिरभी मेरा भारत महान. “म्हणायला काय लागते !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिवराम पाटील (महाराष्ट्र जागृत जनमंच)
प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी सरळ वित्त आयोगातून ग्रामपंचायत ला निधी दिला.आधी गरजेनुसार कृती आराखडा बनतो. लोकसंख्यानुसार निधी दिला जातो. कृती आराखड्यात जे काम नमूद असेल तेच काम करावे लागते.वार्षिक वित्त आयोगाच्या निधीतून जे काम केले त्याचा लेखाजोखा म्हणजे कृती अहवाल.ही व्यवस्था गावकऱ्यांना माहिती नसते.त्यांना फक्त मंडप, जेवण , वाजंत्री, सटावट, हारतुरे दिसतात.एखादा तिसमारखा आमदार किंवा मंत्री गावात बोलवला की, लोक यालाच विकास समजतात. जयंत पाटील ग्रामविकासमंत्री असतांना ज्या गावच्या सरपंचाला राष्ट्रपती पुरस्कार दिला तेच सरपंच हाणामारी, बलात्कार, हापमर्डरच्या गुन्हात अडकले. अडकले नव्हे तो त्या सरपंचांचा धंदाच होता,आहे. याची माहिती ग्रामविकासमंत्रीने न घेता, ट्यांव ट्यांव करीत लाल दिव्याची गाडी गावात आणली. मागेपुढे सरकारी गाडी, पोलिस, कमांडोपाहून ग्रामस्थांना वाटले, व्वा! काय सरपंच आहे ! मंत्रीला गावात आणले. मंत्रीला वाटले ,व्वा! काय सरपंच आहे ! काय बडदास्त आहे ! बिलकुल शहाजी बापूसारखीच, गुवाहाटीला केली होती तशीच.
दुर्भाग्य हेच की, मंत्रीला माहिती नाही की हा सरपंच सराईत गुन्हेगार आहे. पिढीजात हाणामारी, शिणाजोरी करतो. हा गॅंग चालवतो. नको ते दाऊदचे धंदे करतो. हाच तर गावात गॅंगवार करतो. “आधे अस्पताल मे और आधे जेलमे.”

पारोळा तालुक्यातील मोंढाळे पिंपरी गावातील गावठाण जमीन सरपंच व ग्रामसेवकाने गोलमाल करून प्लॉट पाडून विकून टाकले. त्या गावचे गुलाब जगन्नाथ पाटील यांनी तक्रार केली. तर दोन वर्षे बीडीओ, सीईओ आणि कलेक्टरला समजलीच नाही. म्हणून गुलाब पाटील कोर्टात गेले. कोर्टाने जमीन परत घेण्याचा आदेश दिला. एक ग्रामसेवक मेला. दुसरा जेलमधे गेला. तरीही ती जमीन चोरांच्या नरडीतून बाहेर काढता आली नाही. पण तोच माणूस, तक्रारदार गुलाब पाटील जीव मुठीत धरून गाव सोडून धुळ्याला राहातो. महिलेचा विनयभंग, अट्रासिटी , सरकारी कामात अडथळा असे सर्वच कायदे त्यांच्यावर अजमावले गेले. पाचोरा जामनेर , धरणगाव, एरंडोल, जळगाव, शिरपूर अनेक तालुक्यातील गावांची रहस्यमय चोरकथा सीईओच्या टेबलावर धुळखात पडलेल्या आहेत. मुक्ताईनगर आणि रावेर यात आघाडीवर आहेत. पाटील पुन्हा ग्रामविकासमंत्री झाले तर तर या सरपंचांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन टाकू.
काही शहाणे आरटीआयने तक्रारी केल्या. तक्रारीनंतर अनेक सरपंच अपात्र झालेत. ग्रामविकास राज्यमंत्री ने फक्त पन्नास हजार रूपयात त्यांना पात्र केलेत. अशा लाचखोर ग्रामविकासमंत्रीला अपात्र करण्याची तयारी करावी लागेल.
मंत्र्याने गावात येऊन सरपंचाला राष्ट्रपती पुरस्कार दिला की, गावातील माया-बहिणी जास्त दचकून वचकून राहातात. साधी सभ्य माणसे ग्रामपंचायतमधे फिरकत ही नाही. ना ग्रामसभा, ना ग्रामपंचायत. फक्त होते झेंडावंदन. दोनचार असले तर शिक्षित, उच्चशिक्षित माणसे या भानगडीत पडतही नाहीत. मतदान ही करीत नाहीत. जळगांव जिल्ह्यातील अशी अनेक गावे आहेत की, जेथे सरपंचाने अनुदानित विहीरी स्वताच्या शेतातच खोदल्या. अनेक सरपंचांनी सर्वच शेततळे, साठण शेड स्वताच्या शेतातच बांधले. अनेक सरपंचांनी स्वताचे अंगण, स्वतःची गल्ली चिकणी करुन घेतली. फरशी फक्त स्वताःच्या शेडकडे नेणारी बांधली. असा हा प्रकार आणि हे पाप झाकण्यासाठी शिवपुराणचे मंडप टाकले जातात. गणपती उत्सव, शिवजयंती. स्वर्गातील देव याच मंडपातून दिसतो. भजन कीर्तन, जेवण मिळाले की, कोंड्या खूष. डोक्यावरचे केस दिले की, बापाचे उपकार फिटतात. तसेच मंडप टाकून जेवण दिले की, पापाचे परिमार्जन होते.
काही सरपंचांनी तर गावोगावी आरोग्य शिबीरे सुरू केली. ताई-माई-आक्का या, डोळे तपासून घ्या. जेवण करून घ्या.चष्मा फुकट घ्या. आणि आम्हाला झेडपी निवडणुकीत मतदान करा. त्या ताईला कळलेच नाही की, डोळे चांगले असूनही का तपासले? डोळे चांगले असूनही चष्मा का लावला?घरची परिस्थिती बरी असूनही फुकटचे जेवण का केले? सरपंच या कामासाठी निवडून देतो का? पोटच्या पोऱ्या कधीच डोळे तपासण्यासाठी नेत नाही आणि हा दुसऱ्याचा पोऱ्या माझे डोळे का तपासून देतो ? कोठून आणला असेल हा पैसा ? कापुस, केळी, मिरची, मका विकून खर्च केला असेल का ? हे प्रश्न त्या ताई, माई, आक्का, काकू, मावशीला पडत नाहीत, तोपर्यंत या लोकशाहीचे असेच तिनतेरा होत राहातील. सरपंच लयलूट करीत राहिल.
सरपंचाने टाकलेल्या मंडपात ढुंकून पाहिले तर चाळीस पन्नास हजार पगार घेणारे तेथे एकमेकांना ढुस्सी मारून जेवणाला फतकल मारतात. “रस्सा नको तरी पाहिजे” म्हणून वाढीमधे हात घालतात. या अशा लोकांकडे पाहूनच राजीव गांधींनी ” मेरा भारत महान ” म्हटले असेल का ? तसे असेल तर मी पण म्हणतो,” सौ मे से निन्न्याण्णव बेईमान, फिरभी मेरा भारत महान. “म्हणायला काय लागते. जर चोरांना, बलात्कारींना, लुटारूना राष्ट्रपती पारितोषिक मिळत असेल तर भारत महान लोकांचा देश आहेच. चोरांना, दंगेखोरांना, बलात्कारींना जे सरपंच निवडून देतात. ते ग्रामस्थ महान आहेत. चोरी करणारे सरपंचही महान आहेत आणि त्यांना घरपोहच पुरस्कार देणारे मंत्रीही महान आहेतच.
शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच (जळगाव)


