नगर तालुका पोलीसांनी बनावट चलनी नोटांचा केला पर्दापाश ; तब्बल ८० हजारांच्या बनावट नोटा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : नगर तालुका पोलीसांनी बनावट चलनी नोटांचा पर्दापाश केला आहे. या छाप्यात हुबेहुब भारतीय चलनाच्या ५०० रूपये दराच्या बनावट १६० नोटा त्यांची किं. ८० हजार रुपये मिळून आले. तर २ हजार ८७० रुपयांच्या ख-या भारतीय चलनाच्या नोटा मिळून आल्या आहेत.
सोमनाथ माणीक शिंदे (वय २५, रा. तपोवन रोड ता.जि. अहिल्यानगर), निखील शिवाजी गांगडे (वय २७, रा. कुंभळी ता. कर्जत जि.अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनी प्रल्हाद गिते, पोहेकाँ खंडेराव शिंदे व चासफौ दिनकर घोरपडे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२७ जुलै २०२५ ला नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि. श्री. गिते यांना माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी दोन पंचांना बोलावून घेऊन सपोनी प्रल्हाद गिते यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह सरकारी वाहनाने रूईछत्तीशी गावात जाऊन १० वाजण्याच्या सुमारास सापळा लावला, तेव्हा त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वाहन हे येताना दिसले, तेव्हा सपोनि श्री गिते व पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या वाहनास थांबण्यास इशारा करून वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. तेव्हा सपोनि श्री गिते यांनी वाहनात असणा-यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे
सांगितली. त्यांना सपोनी गिते यांनी त्यांची व पंचांची ओळख सांगून वाहनाची व त्यांची अंगझडती घेण्याचा उद्देश सांगितला असता, त्यानी अंगझडती देण्यास नकार दिला. तेव्हा दोन पंचासमक्ष सपोनि श्री गिते यांनी त्यांची अंगझडती व वाहनाची झडती घेतली. या दरम्यान त्याच्या ताब्यात हुबेहुब भारतीय चलनाच्या ५०० रूपये दराच्या बनावट १६० नोटा त्यांची किं. ८० हजार रुपये मिळून आल्या. तर २ हजार ८७० रुपये
ख-या भारतीय चलनाच्या नोटा मिळून आल्या. त्यांची अंगझडती मध्ये ३ ॲन्ड्रॉईड मोबाईल व महिंद्रा कंपनीची थार गाडी मिळून आली. दोघांकडून एकूण १७ लाख ३७ हजार ८७० रु. किं चा मुद्देमाल जप्त करुन त्याच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुर नं ६२८/२०२५ भा न्या स कलम २०२३ चे कलम १७९, १८०,३ (५) प्रमाणे पोहेकाॅ खंडेराव शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसई भरत धुमाळ हे करीत आहेत.


