दरोडा तयारीतील चौघांना पकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
श्रीरामपूर : तालुक्यातील उंबरगांव येथे दरोड्याचे तयारीत असलेल्या चौघांना ४ लाख २६ हजार ७०० रुपये किंमतीचे मुद्देमालासह पोलिसांनी पकडले आहे. या पकडण्यात आलेल्यांकडून घरफोडीच्या 2 गुन्ह्यांची उकल करण्यात ‘नगर एलसीबी’ ला यश आले आहे. स्वरुप ऊर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे (वय २४), द-या बरांड्या भोसले (वय २५), आजब्या महादु भोसले (वय २९, सर्व रा. अंतापुर, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर), कुलत्या बंडु भोसले (वय २३, रा. बाबरगांव, ता. गंगापुर, जि. छ. संभाजीनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुभर्मे, श्रीरामपूर डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोउपनि सोपान गोरे व अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, पंकज व्यवहारे, विशाल दळवी, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, संदीप चव्हाण, संदीप दरंदले, संतोष खैरे, फुरकान शेख, अमृत आढाव, रविंद्र घुंगासे, विशाल तनपुरे, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, मयुर गायकवाड, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, अरुण मोरे व मोहम्मद शेख आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, गुंड्या डिस्चार्ज काळे (रा. छत्रपती संभाजीनगर) हा त्याचे ५ ते ६ साथीदारांसह दोन दुचाकीवर येऊन बेलापुर ते पढेगांव रोडवर काळभैरवनाथ मंदीराचे कमानीजवळ (ता. श्रीरामपूर) येथे अंधारामध्ये थांबून कोठे तरी दरोडा घालण्याचे तयारीत दबा धरुन बसलेले आहेत, आता गेल्यास मिळून येईल, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोनि श्री आहेर यांनी एलसीबी टिम’ला माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे एलसीबी टिम’ने माहिती ठिकाणी बेलापुर ते पढेगांव रोडवर, काळभैरवनाथ मंदीराचे कमानी समोर (ता. श्रीरामपूर) येथे जाऊन खात्री करता काळभैरवनाथ मंदीराचे कमानी समोरील ओढयाचे पुलाजवळ, उंबरगांव शिवारात काही संशयीत दबा धरुन बसलेले दिसले. पथक संशयीतांना पकडण्याचे तयारीत असतांना, त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळून जाऊ लागले. एलसीबी टिम’ने त्यांचा पाठलाग करुन चौघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी तेथून दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारामध्ये थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यावेळी त्यांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे सांगितले. त्याच्याकडे पळून गेलेल्या संशयीतांची नांव पत्ते विचारले असता त्यांनी पळून गेलेल्यांची नावे रवि ऊर्फ रविंद्र मुबारक भोसले व सोहेल पठाण ( दोघे रा. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे गुन्हे केले याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी नेवासा व श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.


