संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- देशाच्या 75व्या अमृतमहोत्सवानिमित्त आजादी का अमृत महोत्सव उपक्रम 15 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीत राबवले जात आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये लोकसहभागातून महाश्रमदान करून स्वच्छता ही सेवा अभियानाची सुरुवात करण्यात आली या महाश्रमदानास जिल्ह्यातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे प्रतिपादन राजेंद्र क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी केले.
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये महाश्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले होते. स्वच्छता अभियानातील अहमदनगर जिल्ह्याची कारकीर्द पाहता अहमदनगर जिल्ह्याने यापूर्वीही राज्य पातळीवरील व विभाग पातळीवर स्वच्छता ही सेवा व स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मानांकन मिळवले आहे. अहमदनगर जिल्हा हा राज्यामध्ये कायमच दिशादर्शक व मार्गदर्शक ठरला आहे. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांना महाश्रमदान करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले होते.
आज झालेल्या महा स्वच्छता श्रमदाना मध्ये कोविड१९ चे सर्व नियम पाळून गावोगावी लोकसहभागातून श्रमदान करण्यात आले. गाव स्तरावरील शाळा, अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य केंद्रे , सार्वजनिक ठिकाणे व परिसर, मंदिरे व बाजारपेठा या ठिकाणी श्रमदान करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कचरा संकलन व वर्गीकरण पाण्याच्या स्रोताच्या ठिकाणची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता, शासकीय कार्यालयाची स्वच्छता करणेत आली. या अभियानाअंतर्गत १०० दिवसाच्या स्थायित्व व सुजलाम अभियानांतर्गत जिल्ह्यांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी ४०,००० शोषखड्डे निर्मितीची मोहीम सुरू करण्यात आली आहे . तसेच नादुरूस्त वैयक्तिक शौचालयांची दुरुस्ती , एका शोषखड्ड्याचे शौचालयाचे रुपांतर दोन शोषखड्ड्यामध्ये करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वछतेच्या जनजागृतीसाठी स्वच्छता घोषवाक्ये व चित्रे काढणेस सुरूवात करण्यात आलेली आहे. आझादी का अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यात स्वच्छतेच्या श्रमदानास गावातील लोकांचा उत्साहपूर्वक सहभाग मिळालेला आहे. कोविड १९ चे सर्व उपाययोजना व प्रोटोकॉल पाळून लोकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केलेली आहे. त्यासाठी तालुकास्तरावर तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत,गावातील सरपंच,ग्राम विकास अधिकारी, तसेच तालुकास्तरीय गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता),गटसमन्वयक व समुह समन्वयक यांचे मोलाचे योगदान लाभले.
अहमदनगर जिल्ह्याची स्वच्छतेची कामगिरी पाहता यापूर्वीही जिल्ह्यातील लोकांचा सहभाग स्वच्छतेमध्ये खूप मोठा होता सर्व गावांनी शंभर दिवसांच्या स्थायित्व व सुजलाम अभियानात सहभागी होऊन घनकचरा व सांडपाणी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांनी शोषखड्डे काढून सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावावा- जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर



