संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः चाईल्ड लाईन संस्थेच्या कर्मचारी असल्याची बतावणी करुन 3 अल्पवयीन मुलींना पळवून अश्लील कृत्य करणार्या आरोपीस सक्त मजुरी शिक्षा सुनावली. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे राहणारा आरोपी सोमनाथ उर्फ ऋषीकेश एकनाथ हापसे (वय 32) याने चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी असल्याची बतावणी करुन तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेले. त्यांच्याशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माथुरी एच. मोरे यांनी आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 8 तसेच भादवि. कलम 363,366, 354 अन्वये अन्वये दोषी धरून आरोपीस बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 8 नुसार 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, रक्कम रुपये 3 हजार दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच भादवि. कलम 366 नुसार 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रु.3 हजार रु. दंड न भरल्यास एक महिना साथी कैद अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.
घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, दि.13 ऑक्टोबर 2023 रोजी फिर्यादी हिने तिची अल्पवयीन लहान बहिण तसेच बहिणीच्या दोन अल्पवयीन मैत्रिणी या शाळेत जातो म्हणून घरातून बाहेर गेल्या, त्या परत आल्या नाहीत म्हणून तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी फिर्याद दिली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात भादंवि. कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा तपास महिला पीएसआय. पुनम श्रीवास्तव यांच्याकडे सोपवण्यात आला. तपास चालू असताना तोफखाना पोलिसांना तिन्ही अल्पवयीन पिडीत मुली या हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलिसांनी हैद्राबाद येथे जाऊन तिन्ही अल्पवयीन पिडीत मुली ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात घेऊन आले. तिन्ही अल्पवयीन पिडीत मुलींचा तोफखाना पोलिसांनी जबाब नोंदविला. त्यात त्यांनी सांगितले की, दि.12 ऑक्टोबर2023 रोजी तिन्ही अल्पवयीन पिडीत मुली या शाळेत जातो म्हणून घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या फिरण्यासाठी सिध्दबाग येथे थांबल्या. सिध्दीबाग येथून या तिन्ही पिडीत मुली त्यांच्या इतर मित्रांसमवेत डोंगरगण येथे फिरावयास गेल्या. तेथे धबधबा पाहुन फिरुन संध्याकाळच्या सुमारास पिडीत मुलींच्या मित्रांनी पिडीत मुलींना पुन्हा सिध्दीबाग येथे सोडले. सिध्दीबाग येथे परतल्यानंतर मुलींची घरी जाण्याची इच्छा नसल्याने त्या सिध्दीबाग बाहेरील रस्त्यावर फिरत असताना अप्पू हत्ती चौक याठिकाणी आरोपी सोमनाथ उर्फ ऋषीकेश एकनाथ हापसे हा त्याची टोयोटा कंपनीची गाडी घेऊन त्यांचे जवळ आला व त्यांना म्हणाला की, तुम्ही कोण आहात एवढ्या उशिरा काय करत आहात पोलिसांना फोन लावू का? त्यावर पिडीत मुलींनी आरोपीस तुम्ही कोण आहात असे विचारले असता त्याने मी चाईल्ड लाईनचे काम करतो मी तुम्हाला मदत करतो असे म्हणून त्याचे गाडीत बसायला सांगितले. त्याचे नाव ऋषीकेश असल्याचे सांगितले. त्यानंतर पिडीत मुली या त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याचे गाडीत बसल्या त्याने पिडीत मुलींना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तो राहत असलेल्या त्याच्या रुमवर घेऊन गेला. पिडीत मुली या आरोपी सोबत रात्रभर त्या रुमवर राहिल्या. त्यावेळी आरोपीने दोन मुलीशी अश्लिल वर्तन केले तसेच एका मुलीसोबत तिचे इच्छेविरुध्द शाररिक संबंध केले. दुस-या दिवशी तिन्ही पिडीत मुली यांनी आंम्हाला हैद्राबादला नातेवाईकांकडे जायचे असल्याचे सांगितल्याने आरोपीने त्यांना रेल्वे स्टेशन (अहिल्यानगर) येथे त्याचे गाडीतून आणून सोडले. त्यानंतर तिन्ही मुली रेल्वेने पुणे रेल्वे स्टेशन येथे गेल्या तेथून हैद्राबादला गेल्या. तेथे एका पिडीत मुलीच्या ओळखीच्या व्यक्तीचे बॉबी लॉज होते त्या ठिकाणी पोहचल्या. अल्पवयीन पिडीत मुली लॉजवर आल्या असल्याचे समजल्यावर लॉज मालकाने हैद्राबाद पोलिसांना मुली त्यांच्याकडे असल्याची माहिती कळवली. त्यानंतर हैद्राबाद पोलिसांनी तिन्ही पिडीत मुलींना लॉजवर जाउन ताब्यात घेतले व मुलींची माहिती तोफखाना पोलिसांना कळवली. माहिती समजल्यानंतर तोफखाना पोलिस हैद्राबाद येथे जाऊन पिडीत मुलींना ताब्यात घेऊन अहिल्यानगर येथे पोलिस ठाण्यात घेऊन आले, अशा पध्दतीने पिडीत मुलींचा जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी पिडीत मुलींची मेडिकल करुन घेतली. त्यानंतर पिडीत मुलींनी दिलेल्या वर्णनानुसार तोफखाना पोलिसांनी आरोपीस अटक केली. पिडीत मुलींच्या जबाबावरुन आरोपीविरुध्द भादवि.कलम 366,376(3), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 4,6 नुसार कलम वाढवण्यात आले. घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उपनिरीक्षक पुनम श्रीवास्तव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, अल्पवयीन पिडीत मुली, पंच साक्षीदार, मुख्याध्यापक, वैदयकिय अधिकारी, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात अहमदनगर महानगरपालिकेचे माहितगार इसम यांची साक्ष नोंदविण्यात आली. केसमध्ये तीन पिडीत मुली पैकी एक पिडीत मुलगी उलट तपासणीमध्ये फितुर झालेली होती.
सरकार पक्षाचा संपूर्ण पुरावा ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुध्द बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 8 नुसार चार्ज वाढविला. या केसची सुनावणी चालू असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, सर्व तिन्ही पिडीत मुली या 16 वर्षाखालील आहे. आरोपीने तो चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी असल्याचे खोटी बतावणी करुन पिडीत मुलींचा विश्वास संपादन केला. आरोपी याने यापूर्वी देखील खोटे बनावट नाव धारण करुन फसवणुकीचा गुन्हा केलेला होता. त्या केसची सुनावणी होऊन आरोपीस दोषी धरुन त्यास शिक्षा झालेली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पिडीत मुली या वय वर्षे 16 च्या आतील असलेल्या अज्ञान मुली या आरोपीविरुध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगतील? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील श्रीमती मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी मपोकॉ. अडसूळ, तसेच पोहेकॉ. मुश्ताक शेख, ए.एस.आय. नितीन गायकवाड यांनी सहकार्य केले.


