कोपरगावातील नरभक्षक बिबट्या अखेर ठार, 15 दिवसांत घेतलेला दोघांचा जीव

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर  : गेल्या काही दिवसांपासून पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याने हैदोस घातला होता. त्यामुळे या बिबट्याला ठार करण्यात यावे या मागणीसाठी लोकांनी आंदोलन सुद्धा केले. त्यानंतर 4 नोव्हेंबरला वन विभागाच्या शार्प शूटर्सनी त्याला ठार केले. या घटनेनंतर पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यात अनेक बिबटे पाहण्यात आले. शुक्रवारी (ता. 14 नोव्हेंबर) नाशिकमध्ये नागरी वस्तीत शिरलेल्या एका बिबट्याला चार तास लागले. लोकांनी भरदिवसा हा चार तासांचा थरार अनुभवला. बिबट्यांचा नागरी वस्तीत वावर वाढल्याने आता त्यांना आवर घालण्याचे मोठे आव्हान वन विभागाकडे आहे. पण एखादा नर भक्षक बिबट्या आहे, अशी माहिती कळताच किंवा एखादा संशयास्पद बिबट्या वाटताच त्याला ठार करा, असे आदेशच वन मंत्री गणेश नाईक यांनी दिलेले आहेत, अशातच आता नगर जिल्ह्यातील कोपरगावात नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील ऊसतोड कामगाराच्या मुलीवर आणि येसगाव येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्याशिवाय या नरभक्षक बिबट्याने शिंगणापूरमध्ये एका मुलाला गंभीर जखमी केले होते. पशुधन, पाळीव प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात मारले असल्याने शेतकर्‍यांचा संताप वाढला होता. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाने कोपरगाव तालुक्यात मोठी शोधमोहीम हाती घेतली होती. बिबट्याला पकडण्यासाठी 100 हून अधिक वन कर्मचारी मोहीमेत सहभागी झाले होते. टाकळी, येसगाव, ब्राह्मणगाव परिसरात 15 पिंजरे लावण्यात आले होते. नाशिक आणि पुणे येथून विशेष पथके बोलावण्यात आली होती. 2 शार्प शूटर्स आणि तीन ड्रोन कॅमेर्‍यांचा वापर करून शोधमोहीम सुरू होती.
तर, नागपूर येथील प्रिन्सिपल चीफ कंजर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट यांनी बिबट्याला पकडण्यासाठी व गरज भासल्यास ठार करण्याची परवानगी दिली होती. यानंतर रविवारी (ता. 16 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास धारणगाव शिवारात बिबट्याची हालचाल आढळल्यानंतर वनविभागाने विशेष पथकासह कारवाई सुरू केली आणि नरभक्षक बिबट्याला अखेर ठार केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्याने नगर जिल्ह्यातील कोपरगाव, येसगाव आणि आजूबाजूच्या परिसरात हैदोस घातला होता. दिवसाढवळ्या नागरिकांना बिबट्या नजरेस पडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे संतापलेल्या नागरिकांनी शनिवारी (ता. 15 नोव्हेंबर) अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. अहिल्यानगर तालुक्यातील इसळक, निंबळक आणि खारेखर या तीन गावातील नागरिकांनी पुणे बायपास मार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. ज्यानंतर रविवारी मध्यरात्री मोठ्या थरारानंतर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!