संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुरबाड – महा आवास योजनेत मुरबाड तालुक्याने सन 2020-21 या वर्षाचा जिल्हात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच जिल्हास्तरावर तालुक्याने एकूण 9 पुरस्कार पटकाविले आहेत.
महा आवास अभियान काळात उत्कृष्ट काम करणा-या तालुका व व्यक्तीचा तसेच ग्रामपंचायतींना ठाणे जिल्हाचे पालकमंत्री . एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कारने देऊन सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी आवारातील नियोजन भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वासाठी घरे 2022 हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून त्या अनुषंगाने राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. त्याकरीता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करून गुणवत्तावाढीसाठी जिल्हात 20 नोव्हेंबर 2020 ते 05 जून 2021 या कालावधीत महा आवास अभियान- ग्रामीण राबविण्यात आले. या अभियान कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणा-या तालुका व व्यक्ती तसेच ग्रामपंचायत यांना महाआवास अभियान पुरस्कार आणि महाआवास अभियान विशेष पुरस्कार तालुक्याचे . पंचायत समिती सभापती .दिपक पवार, गटविकास अधिकारी . रमेश अवचार तसेच . सुधाकर कुर्ले कर्मचारी यांना देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणे महानगरपालिका महापौर नरेश म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा, पोलीस आयुक्त जयजीत सिंह, अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, आरोग्य व बांधकाम समिती सभापती श्रेया गायकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे आदि अधिकारी उपस्थित होते.
संकलन: बाळासाहेब भालेराव



