आमचे राज्य असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही ः मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः ज्य सरकारने मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील 8 पैकी 6 मागण्या केल्या आहेत. ज्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर बसलेल्या जरांगेंनी 5 व्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले. पण यामुळे ओबीसी नेते, आंदोलक आणि समाज मात्र चांगलाच नाराज झाला आहे. सरकारमध्ये सुद्धा अनेक ओबीसी नेते आणि मंत्री ज्यांच्यातील काहींनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पहिले नाव येते ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे. भुजबळांनी आता सरकारलाच घरचा आहेर देत त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. पण याचबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भाष्य करत आमचे राज्य आहे, तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होणार नाही, असे सांगितले आहे.
जेएनपोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल फेज-2 च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याबाबतची विचारणा करण्यात आली. तेव्हा याबाबत फडणवीस म्हणाले की, भुजबळ कॅबिनेटमधून कुठेही निघून घेले नाहीत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मी त्यांना आश्वस्त केले आहे. जो जीआर काढलेला आहे. त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही. हा सरसकट जीआर नाही. हा पुराव्याचाच जीआर आहे. फक्त मराठवाड्यामध्ये निजामाचे राज्य होते. त्यामुळे इंग्रजांच्या राज्याचे पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात. मराठवाड्यात मिळत नाहीत. त्यामुळे निजामाचे पुरावे आपण ग्राह्य धरले आहेत. जे खरे कुणबी आहेत. त्यांनाच हा लाभ मिळेल. जे खरे हक्कदार आहे, त्यांनाच त्याचा फायदा होईल. यामध्ये कुणालाही खोटेपणा करता येणार नाही. त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी या जीआरचे स्वागत केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ज्याप्रमाणे ओबीसी संघटनांची शंका दूर करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे भुजबळ आणि इतरांच्या मनातील शंका आम्ही दूर करु. जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. जोपर्यंत हे राज्य आहे, तोपर्यंत एका समाजाचे काढून दुसर्‍याला देण्याचा विचार होऊ शकत नाही. आम्ही मराठ्याचे मराठ्यांना तर ओबीसींचे ओबीसींना देणार आणि खरा अधिकार ज्याचा त्यांना देणार. दोन समाजाला कधीच एकमेकांसमोर आणणार नाही, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. तर, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचे आभार मानले. अनेकवेळा समजुती-गैरसमजुती होतात. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचे आमचे ब्रीदवाक्य असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नसल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!