👉आयपीएस अधिकारी महेश भागवत, अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष निकम, उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्द्ल आयपीएस अधिकारी महेश भागवत, अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष निकम, उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ तर केंद्रीय गृहमंत्री विभागाकडून उत्कृष्ट तपासासाठी “केंद्रीय गृहमंत्री पदक’ कर्जतचे तालुक्यातील सुपुत्र असलेले पोलिस निरीक्षक प्रमोद तोरडमल व सुरेशकुमार राऊत यांना जाहीर झाले आहे.


देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पाथर्डी तालुक्याचे भूमिपुत्र व सध्या हैद्राबाद येथील राचकोंडा विभागाचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले महेश भागवत यांना गेली पंचवीस वर्ष पोलिस दलातील विशिष्ट सेवेबद्दल अतिशय मानाचे असे राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’जाहीर झाले आहे.
खडकी (ता. नगर) सुपुत्र आणि पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभाग(सी.आय.डी.)अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष आप्पासाहेब निकम यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.सुभाष निकम यांचे मूळ गाव खडकी(ता.नगर) असून त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी, सातारा सैनिक स्कूल आणि अहमदनगर महाविद्यालयात झाले. त्यांनी आजपर्यंत ३३ वर्ष विविध पदांवर पोलीस खात्यात सेवा केली आहे. एम.पी.एस.सी. मार्फत १९८९ मध्ये सरळ सेवा भरती मधून पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेची सुरुवात त्यांनी नक्षल विरोधी अभियान अंतर्गत चंद्रपूर मधून केली. त्यानंतर बीड, औरंगाबाद, पुणे, नवी मुंबई आणि गुन्हे अन्वेषण विभागात सेवा करताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले. प्रामुख्याने ८ उघडकीस न आलेले खुनाच्या गुन्ह्याची उकल करून त्यांनी मोठा नावलौकिक प्राप्त केला होता. त्यांना आतापर्यंत विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक आणि पोलिस महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात आलेले आहे.
पुणे शहरातील चतु:श्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात तपासासाठी राज्य सरकारचा उत्कृष्ट तपास पुरस्कार मिळालेला आहे. सेवा निवृत्त प्राध्यापक रामदास वामन यांचे जावई आहेत. त्यांच्या या यशामध्ये त्यांना पत्नी स्मिता यांचे मोठे पाठबळ मिळाले.
दुलेचांदगाव (ता. पाथर्डी) सुपुत्र आणि पुणे ग्रामीणचे (हवेली विभाग) पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना यंदाचे राष्ट्रपती पोलीसशौर्य पदक जाहीर झाले आहे. त्यांनी गडचिरोली येथे किस्नेली चकमकीमध्ये नक्षलवाद्याशी जोरदार लढत देत पाच नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या कल्पकता, नियोजन यामुळे गडचिरोली येथे अनेक नक्षलवाद्यांना शरण आणण्यास भाग पाडले. तसेच ही चळवळ थंडावली. त्यांच्या या शौर्यबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यापूर्वी देखील गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले यांचे भाऊसाहेब हे चिरंजीव आहेत.
कर्जतच्या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री पदक
भारत सरकारच्या गृह विभागाकडुन उत्कृष्ट तपासाकरीता सन २०२२ साठी “केंद्रीय गृहमंत्री पदक” देशभरातील १५१ पोलिस अधिकाऱ्यांनी जाहीर झाले आहे. यामध्ये कर्जत तालुक्याचे सुपुत्र असलेले प्रमोद तोरडमल व सुरेशकुमार राऊत या दोन पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. सुरेशकुमार राऊत हे सध्या शिरूर (पुणे) पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते गेली २७ वर्ष पोलिस दलात आहेत. मुंबई, पुणे शहर, वाशिम, पुणे ग्रामीण आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे हत्यारांचा धाक दाखवून बँक लुटीची घटना घडली होती. ८२४ तोळे सोने चांदीचे दागिने व ३२ लाख ५२ हजार ५६० रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटला होता. त्यांनी आठ दिवसात यातील २ कोटी ३६ लाख ४२ हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन आरोपींना जेरबंद केले होते.
प्रमोद तोरडमल हे सध्या मुंबई येथील खार पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून आहेत. नवी मुंबई येथे २ ऑगस्ट २०२१ रोजी पामबीज येथील पुलाखाली गोणीत भरलेला महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था छिन्नविछिन्न झाली होती. याचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. पोलिस निरीक्षक तोरडमल यांनी हे आव्हान स्वीकारून तपास सुरू केला. हातावरच्या टॅटू व मिसिंगचे गुन्हे याच्या आधारे मुंबई, ठाणे, रायगड येथे तपास केला. ठाणे येथे बबनबाई शांतवन कांबळे या महिलेची मिसिंग फिर्याद होती. आरोपी कानिफनाथ कांबळे याने बबनबाई कांबळे या महिलेचा दगड व काचेचे तुकडे याच्या सहाय्याने खून केला हे तपासात निष्पन्न झाले. या शिवाय गेट वे ऑफ इंडिया, झवेरी बाजार येथील बाँब स्फोटांचा तपास, मुंबई येथील विविध टोळ्यावर केलेल्या कारवाईत १६ गुन्हेगार मारले गेले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड तामिळनाडू येथील आंतर राज्यातील बँक दरोडयातील आरोपींना शस्त्रासह अटक करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.


