संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : अण्णा भाऊ साठे हे ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादीचे होते. सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे.असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे यांनी केले.
पाथर्डी नगरपरिषदेच्या सभागृहात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात अली त्यावेळी गर्जे बोलत होते.याप्रसंगी उपनगराध्यक्षा नंदकुमार शेळके, नगरसेवक महेश बोरुडे, नगरपरिषदेचे कार्यालयीन प्रमुख अय्युब सय्यद,सोमनाथ गर्जे,किशोर पारखे बाळासाहेब बोरुडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना गर्जे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले.साठेंच्या पोवाडा व इतर सामाजिक यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.



