संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अकोले – तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात असणारी भेसळयुक्त दुध बनवण्याचे दोन अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे. ही कारवाई अकोले पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी संयुक्त केली आहे. योगेश धोंडीभाऊ चव्हाण (रा. जांभळी रोड. शिंदेवाडी) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस ठाण्याचे सपोनि मिथुन घुगे यांच्या सूचनेनुसार पोसई भुषण हांडोरे, पोना बाबासाहेब बडे, विठठल शेरमाळे, रविंद्र वलवे, गोविंद मोरे, पोकॉ गणेश शिंदे, राहुल क्षिरसागर आदिंच्या पथकासह अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्री पवार, श्री सुर्यवंशी, श्री बडे यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 22 सप्टेंबर 2021 रोजी योगेश धोंडीभाऊ चव्हाण (रा. जांभळी रोड, शिंदेवाडी, पो.ब्राम्हणवाडा) हा त्याच्या राहत्या घरी व त्याचे मालकीचे संघ केंद्र शिंदेवाडी, (मु. जांभळे.पो. बदगी ता. अकोले) येथील दुधसंकलन केंद्रावर बनावट दूध तयार करीत असल्याची माहिती अकोले पोलीस ठाण्यात मिळाली होती. त्यानुसार ती माहितीची खातरजमा होताच, मिळालेल्या माहीतीबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना कळवून त्यांना बरोबर घेऊन अकोले तालुक्यातील जांभळी रोड, शिंदेवाडी, ब्राम्हणवाडा येथे योगेश धोंडीभाऊ चव्हाण याच्या राहते घरी जांभळी, रोड,( मु. शिंदेवाडी पो. ब्राम्हणवाडा) या ठिकाणी संयुक्तरित्या छापे टाकले. या छाप्यामध्ये बनावट दूध तयार करणारा योगेश धोंडीभाऊ चव्हाण (रा. जांभळी रोड. शिंदेवाडी) यास ताब्यात घेतले. त्याने त्याच्या राहत्या घरी तयार केलेले 28 लिटर 700 रुपयांचे बनावट दूध, बनावट दूध तयार करण्यासाठी वापरलेले 15 लिटर लिक्वीड 2 हजार 25 रुपयांचे व दोन प्रकारच्या पावडर 371 किलो 52 हजार 432 रुपये असा एकूण 55 हजार 720 रुपयांचे बनावट दूध बनवण्याचे साहित्य जप्त केले. त्याचे मालकीचे मे.संघ केंद्र शिंदेवाडी (मु. जांभळे.पो. बदगी ता. अकोले) या ठिकाणी छापा टाकून बनावट दूध तयार करणारा योगेश धोंडीभाऊ चव्हाण (रा. जांभळी रोड. शिंदेवाडी) याने तयार केलेले 998 लिटर 24 हजार 950 रुपयांचे बनावट दूध, असे एकूण 80 हजार 670 रुपयांचे भेसळीचे दूध व साहित्य असा मुददेमाल जप्त करुन त्यातून तपासणीसाठी नमुने घेऊन राहिलेला सर्व दूध साठा नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेले बनावट दूध तयार करण्याचे साहित्य व नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविणार असून हा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहीती अन्न सुरक्षा अधिकारी श्री पवार यांनी सांगितली.
👉बनावट दूध भेसळ होत असल्यास माहिती द्या : सपोनि मिथुन घुगे
अकोले पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही स्वरुपाचे बनावट दूध भेसळ होत असल्यास, याबाबतची माहीती ही अकोले पोलीसांशी संपर्क साधून द्यावीत, असे आवाहन अकोले पोलिस ठाण्याचे सपोनि मिथुन घुगे यांनी केले आहे.





